नरेंद्र मोदींसाठी वाराणसीची जागा सोडून स्वतः कानपूरमधून निवडणूक लढविल्याबद्दल कसलीही नाराजी नसल्याचे भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी सोमवारी स्पष्ट केले. जोशी यांनी वाराणसीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाराज नसल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, स्पष्ट बहुमताच्या जोरावर देशात भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेत आणण्याची लाट आहे. देशाला सध्या कणखर नेतृत्त्व आणि कणखर सरकार हवे आहे आणि या दोन्ही मुद्द्यांची पूर्ती करण्यात मोदी यशस्वी ठरतील.
मोदी सरकार सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळात जाणार का, या प्रश्नावर उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. सध्या आपले लक्ष केवळ निवडून येऊन खासदार बनण्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.