नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुरु झालेल्या अफवांचा बाजार रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. बँकेचे लॉकर सील करण्याचा किंवा हिरे – सोन्याचे दागिने जप्त करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अफवांचा बाजाराही जोरात सुरु होता. केंद्र सरकार बँकेतील लॉ़कर, हिरे – सोन्याचे दागिन्यांवरही जप्तीची कारवाई करणार, दोन हजारच्या नोटा सुमार दर्जाच्या आहे, नोटांमध्ये चीप आहे अशा असंख्य अफवा पसरवल्या जात होत्या. याशिवाय नोटाबंदीच्या निर्णयाची भाजपचे नेते तसेच बड्या उद्योगपतींना माहिती होती अशी चर्चाही रंगली होती. या सर्व अफवा आणि चर्चांवर शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे.  लॉकर, हिरे आणि दागिन्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार नाही असे ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले. कामगार, गृहिणी यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणा-या छोटा रकमेची चौकशी केली जाणार नाही. पण काही ठिकाणी अशा बँक खात्यांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. अशा घटनांवर लगाम लावण्याठी आयकर विभाग सज्ज आहे. अशा बँक खात्यांची चौकशी केली जाईल तसेच त्यांना भरभक्कम दंड आकारला जाईल असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.

शंभर आणि पन्नास रुपयाच्या नोटाही रद्द करण्याची घोषणा लवकरच केली जाईल अशी अफवा सोशल मीडियावरुन पसरवली जात होती. अर्थमंत्रालयाने या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. दोन हजार रुपयांच्या नोटेमध्ये इंटेग्लिओ शाईचा वापर करण्यात आला आहे. नोट खरी आहे की नाही हे ओळखण्यासाठी ही शाई वापरली जाते. ही नोट कापडावर घासल्यास त्याचा रंग कापडाला लागतो. पण या नोटेचा दर्जा सुमार नाही असा पुनरुच्चार अर्थमंत्रालयाने केला.