भारतासमवेत सध्या सुरू असलेल्या पेचप्रसंगात कुठल्याही त्रयस्थ देशाच्या मध्यस्थीची गरज नाही, दोन्ही देशात त्यांच्यातील सीमेवरील वाद मिटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहेत त्यातून मतभेद दूर केले जातील, असे स्पष्टीकरण चीनने केले आहे.

चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजियान यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले, की भारताबरोबरच्या सीमा प्रश्नावर चीनची भूमिका सातत्यपूर्ण व स्पष्ट असून दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये यापूर्वी ज्या गोष्टींवर मतैक्य झाले होते त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर जी चर्चा झाली त्यात चीनबाबतच्या वादाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर विचारले असता झाओ यांनी म्हटले आहे, की भारत व चीन यांच्यात सीमेवरील परिस्थिती आता स्थिर व नियंत्रणात आहे. भारत व चीन यांच्यातच सीमेवरील तंटे सोडवण्यासाठी संवाद व्यवस्था आहे, त्यातून हे प्रश्न सोडवले जातील, त्यात तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही. ट्रम्प यांनी एका ट्विट संदेशात म्हटले आहे,की सीमावादात आमची मध्यस्थी करायची तयारी आहे, तसे आम्ही भारत व चीन या दोन्ही देशांना कळवले आहे. भारत व चीन यांनी ट्रम्प यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव आधीच फेटाळला आहे.

चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ यांनी सांगितले,की चीनची दोन्ही देशातील सीमाप्रश्नावर भूमिका स्पष्ट असून त्यात सातत्य आहे. दोन्ही देशात हे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र संवाद यंत्रणा आहे. भारत व चीन यांच्या नेत्यांमध्ये वुहान व ममलापुरम येथील चर्चेत जे काही ठरले होते त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न आहेत. एप्रिल २०१८ मध्ये चीनचे अध्यक्ष जिनपिंग व पंतप्रधान मोदी यांच्यात पहिली औपचारिक शिखर परिषद वुहानमध्ये झाली होती.