कोणतीही राजकीय खेळी करायची असेल तर चंद्राबाबू नायडू हे त्यातले माहीर खेळाडू आहेत. या खेळात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. खरेतर आंध्र प्रदेशचा विकास झाला पाहिजे या त्यांच्या मागणीसाठी आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. मात्र जे राजकीय नाट्य त्यांनी घडवले त्यात त्यांच्या स्वतःचे महत्त्व वाढवण्याच्या खेळीचा भाग जास्त आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी दिली आहे.

टीडीपी आर्थात तेलगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात दंड थोपटले. अशात भाजपाकडून फारशी काही प्रतिक्रिया आलेली नसतानाच आता राम माधव यांनी हा सगळा राजकीय नाट्याचा भाग आहे असे म्हणत चंद्राबाबूंच्या नाराजीतली हवाच काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

एवढेच नाही तर आम्ही अविश्वास प्रस्तावाला घाबरत नाही. आमचे संख्याबळ संसदेत पुष्कळ आहे. तेलगु देसम पार्टीची भूमिका राजकीय हेतूने प्रेरित आहे असाही आरोप राम माधव यांनी केला. आंध्रप्रदेशाच्या विकासाच्या मुद्द्यावर ते राजकारण करत आहेत. मात्र त्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्यासोबत असूनही ते अविश्वास प्रस्ताव का आणत आहेत? एखाद्या विकासाच्या प्रश्नाचे उत्तर हे अविश्वास प्रस्ताव असू शकते का? याची उत्तरे चंद्रबाबू नायडूंना द्यावी लागतील असेही राम माधव यांनी म्हटले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टीडीपीने एनडीएतून बाहेर पडणे ही काही चांगली गोष्ट नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत चंद्राबाबू नायडूंनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीतच मिळाले. केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी काहीही दिले नसल्याचे कारण देत चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएला राम राम करणे पसंत केले अशात भाजपाकडून त्यांना काय उत्तर दिले जाणार हे महत्त्वाचे ठरणार होते. त्यानुसार राम माधव यांनी त्यांना उत्तर देत चंद्रबाबूंनी राजकीय ड्रामा केल्याची टीका केली आहे.