तुरुंगवासाच्या शिक्षेची मुदत संपून गेली असतानाही पाकिस्तानातील काही कैद्यांना भारतातील विविध तुरुंगांमध्ये डांबून ठेवले आहे, हा पाकिस्तानचा आरोप भारताने शुक्रवारी फेटाळून लावला. पाकिस्तानचा हा आरोप तथ्यहीन असून, पाकिस्तानातील कोणत्याही कैद्याला शिक्षेच्या मुदतीशिवाय भारतातील तुरुंगात ठेवण्यात आलेले नाही, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबत माहिती दिली. भारतातील तुरुंगात असलेल्या परदेशी नागरिकांचे नागरिकत्व तपासले जाते. पाकिस्तानी नागरिक असलेला कोणताही कैदी शिक्षेच्या मुदतीशिवाय भारतीय तुरुंगात नाही. शिक्षा पूर्ण न केलेले असे कित्येक कैदी आहेत, ज्यांच्या पाकिस्तानी नागरिकत्वाबाबत पाकिस्तानी सरकारने अद्याप पुष्टी केलेली नाही, असे अकबरुद्दीन म्हणाले.
भारतातील विविध तुरुंगांमध्ये पाकिस्तानी नागरिक असलेले ४८४ कैदी आहेत, मात्र त्यांपैकी २५ कैद्यांची शिक्षेची मुदत पूर्ण झाली असतानाही त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे, असा आरोप गेल्या आठवडय़ात पाकिस्तानकडून करण्यात आला होता.
पाकिस्तानने १५१ भारतीय कैद्यांची मुक्तता केल्यानंतर भारताने ३० मे रोजी ३७ पाकिस्तानी कैद्यांची मुक्तता केली होती. त्यापैकी ३२ मच्छीमार आणि दोन सामान्य नागरिकांचा समावेश होता. भारतात सत्ताबदल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहिले होते.
 त्यानंतर शरीफ यांनी पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. सध्या भारताचे २२९ मच्छीमार आणि ७८० जहाजे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.