सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी करण्यात भारतीय लष्कराने केलेल्या ‘ब्ल्यू स्टार’ कारवाईत तत्कालीन मार्गारेट थॅचर सरकारचा कदापिही सहभाग नव्हता, असे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी स्पष्ट केले आहे. ‘या कारवाईत ब्रिटन सरकारचा बिलकूल हात नव्हता,’ असे कॅमेरून म्हणाले.
सुमारे २०० फायली आणि २३ हजारांहून अधिक दस्तावेज तपासण्यात आल्यानंतर या निष्कर्षांप्रत आल्याचे कॅमेरून यांनी शीख समुदायासमोर एका व्हिडीओ संदेशाद्वारे नमूद केले. या प्रकरणी कॅमेरून यांनी चौकशीचेही आदेश दिले आहेत. सुमारे चार महिन्यांपूर्वी भारत सरकारच्या विनंतीवरून ब्रिटनमधील एका लष्करी अधिकाऱ्याकडून सल्ला देण्यात आला होता. परंतु तो मानण्यात आला नाही, असेही कॅमेरून यांनी स्पष्ट केले.
सुमारे ३० वर्षांपूर्वी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात मोठी दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये अनेकांनी प्राण गमावले. शीख समाज अजून त्या धक्क्यातून बाहेर आलेला नाही. असे सांगत या प्रकरणी भारतीय लष्कराच्या या कारवाईत तत्कालीन ब्रिटन सरकारचा सहभाग असल्याची शक्यता असल्याचे काही आठवडय़ांपूर्वी दस्तावेजांद्वारे उघडकीस आले तेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण तातडीने चौकशीचे आदेश दिले. मंत्रिमंडळ सचिवांनाही या प्रकरणी सत्यशोधन करण्याची सूचना दिली, असे कॅमेरून यांनी सांगितले. शीख समुदाय आणि सरकार यांच्यात संवाद सुरू राहावा, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.