मोदी सरकारच्या काळातील सर्जिकल स्ट्राईक हा भारतीय सैन्याने केलेला पहिलाच सर्जिकल स्ट्राईक असल्याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. स्वत:च्या कौतुकाची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप सरकारने या कारवाईनंतर स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, काँग्रेसने त्यावर आक्षेप घेत यापूर्वीही अशाप्रकारच्या लष्करी कारवाया झाल्याचा दावा केला होता. मात्र, आमच्या सरकारने कधीही त्याचा गवगवा केला नाही, असेही काँग्रेसने भाजपला सुनावले होते. परंतु, लष्करी कारवाईच्या महासंचालनालयाकडून (डीजीएमओ) नुकत्याच करण्यात आलेल्या एका खुलाशामुळे मोदींच्या काळातील सर्जिकल स्ट्राईक ‘एकमेव’ असल्याच्या शक्यतेला अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळत आहे.

माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. ‘पीटीआय’ने माहिती अधिकाराखाली ही माहिती विचारली होती. सर्जिकल स्ट्राइक स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला होता का, २००४ ते २०१४दरम्यान सर्जिकल स्ट्राइक केला होता का, आदी बाबी अर्जात विचारण्यात आल्या होत्या. या अर्जाला उत्तर देताना ‘डीजीएमओ’ने म्हटले आहे की, २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) इंटिग्रेटेड मुख्यालयात असलेल्या ‘डीजीएमओ’ने ही माहिती दिली आहे. या विभागात यापूर्वी कुठल्याही पद्धतीचा सर्जिकल स्ट्राइक केला असेल, तर त्याची नोंद उपलब्ध नाही. या संदर्भातील निवेदनही ‘डीजीएमओ’ने पत्रकार परिषदेत दिले.

याशिवाय, अर्जाला दिलेल्या उत्तरामध्ये ‘डीजीएमओ’ने सर्जिकल स्ट्राईकची व्याख्याही स्पष्ट केली. ‘ओपन सोर्स’मधील उपलब्ध माहितीनुसार सर्जिकल स्ट्राइक म्हणजे गुप्त माहितीच्या आधारे, जास्त परिणाम आणि कमीतकमी किंवा शून्य नुकसान हे वैध लष्करी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेला हल्ला होय. यामध्ये जाणीवपूर्वक शत्रूच्या प्रदेशात शिरून अचूक अंमलबजावणी आणि वेगाने हल्ला करून आपल्या प्रदेशात परतणे अपेक्षित असते.