17 February 2019

News Flash

सुरक्षा मंजुरीविनाच ‘तेजस’ची धाव

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून रेल्वे मंत्रालयास जाबविचारणा

( संग्रहीत छायाचित्र )

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून रेल्वे मंत्रालयास जाबविचारणा

कोकण, तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली व मुंबई-गोवा अंतर झपाटय़ाने पार करणारी तेजस एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या आवश्यक त्या सुरक्षामंजुऱ्यांविनाच सुसाट धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वेग आणि या गाडीची आलिशान रचना, सोयी-सुविधा यामुळे प्रत्यक्षात रुळांवर येण्याआधीपासूच ही गाडी गाजत होती. या गाडीचा सुसाट वेगातील प्रवास प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचा असला तरी अशी नवी गाडी सुरू करण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून काही सुरक्षा मंजुऱ्या घेणे आवश्यक असते; या मंजुऱ्याच रेल्वेने घेतल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ही नवी गाडी सुरक्षा मंजुऱ्यांविनाच का सुरू केली आणि अशा मंजुऱ्यांविना तिचा प्रवास कसा काय सुरू आहे?’, असा जाब रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मध्य रेल्वे, तसेच रेल्वे मंत्रालयास विचारला आहे. त्यावर रेल्वे मंत्रालयाने मोठे मासलेवाईक उत्तर दिले आहे. ‘या गाडीची जी वैशिष्टय़े नोंदवण्यात आली आहेत त्यातील अनेक वैशिष्टय़े अद्याप प्रत्यक्षात अंमलात आणलेली नाहीत. ज्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा मंजुरी घ्यावी लागेल, अशी कोणतीही नवी गोष्ट या गाडीत समाविष्ट करण्यात आलेली नाही’, असे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सुरक्षा आयुक्तांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

धोरणाचे उल्लंघन

रेल्वे गाडीत कुठल्याही नव्या गोष्टी असतील तर त्यामुळे रेल्वे रुळांवर येणारा भार व इतर गोष्टी बदलत असतात. त्यामुळेच नवी वा नव्या गोष्टींची जोड दिलेली गाडी चालवायची असेल तर सुरक्षा आयुक्तांकडून त्यास मंजुरी घेणे आवश्यक असते. तसे रेल्वे मंडळाच्या धोरणातच म्हटलेले आहे. त्यास बगल देऊन गाडी चालविणे म्हणजे या धोरणांचे सपशेल उल्लंघन आहे, असा ठपका रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आपल्या पत्रात ठेवला आहे.

 

First Published on July 27, 2017 12:05 am

Web Title: no security clearance for tejas express
टॅग Marathi Articles