कोसीची उपनदी असलेल्या भोटे कोसी या नदीचे चोंदलेले मुख उघडण्यासाठी नेपाळकडून सोमवारी तरी कोणतेही स्फोट करण्यात आलेले नाहीत़  त्यामुळे येत्या २४ तासांत तरी बिहारमधील नऊ जिल्ह्यांना कोसीच्या पुरापासून दिलासा मिळणार आह़े
दरड कोसळून तयार झालेल्या कृत्रिम तलावामुळे बंद झालेले भोटे कोसीचे मुख उघडण्यासाठी सोमवारी स्फोट करणार नसल्याचे नेपाळने केंद्र शासनाच्या माध्यमातून कळविले आहे, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव व्यासजी यांनी येथे पत्रकारांना सांगितल़े  रविवारी नेपाळकडून असे स्फोट घडविण्यात आले होत़े  त्यामुळे कोसीतील पाण्याची पातळी २५ लक्ष क्यूसेक्सवरून ३२ लक्ष क्यूसेक्सपर्यंत वाढली होती़ नेपाळकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिथे दिवसभरात विशेष पाऊस झालेला नाही़  
भोटे कोसीच्या बंद झालेल्या मुखावरील पाण्याची पातळीही प्रतितास ३ इंच या वेगाने घटत आह़े  परंतु, नव्याने तयार झालेल्या तलावाच्या खोलीबद्दल मात्र अद्यापही परस्पर भिन्न मते आहेत़  आधीच्या अहवालानुसार त्याची खोली ८० मीटर असावी, असे नमूद करण्यात आले होत़े
 पंरतु, पुढच्याच अहवालात ती ४० ते ६० मीटर असल्याचे म्हणण्यात आल़े  या ठिकाणी गेलेले भारतीय पथकही केवळ इथले हवाई सर्वेक्षण करू शकले आहे, असेही व्यासजी यांनी सांगितल़े
 तसेच नेपाळमध्ये स्फोट घडविल्यानंतर उसळलेले पाणी बिहारमधील बिरपूपर्यंत पोहोचण्यासाठी किमान २० तासांचा कालावधी लागतो, असेही त्यांनी सांगितल़े  येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी या वेळी सांगितले.