अवघ्या काही महिन्यांमध्येच उत्तर कोरिया अमेरिकेवर अण्वस्त्रांनी सज्ज क्षेपणास्त्र डागू शकेल अशी सार्थ भीती सीआयएने व्यक्त केली आहे. माइक पाँपेओ या सीआयएच्या संचालकांनी बीबीसीशी बोलताना प्योंग्यांग व किम जोंग उन यांच्याकडून असलेल्या धोक्यासंदर्भात वरचेवर चर्चा करण्यात येते. उत्तर कोरियाची सध्याची तयारी बघता अवघ्या काही महिन्यांमध्येच तो देश अमेरिकेवर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र डागू शकेल अशी शक्यता असल्याचेही माइक म्हणाले. अमेरिकेच्या अध्यक्षांना गुप्त माहिती देणं आमचं काम आहे, जे आम्ही करतो आणि कशाप्रकारे अमेरिकेला सुरक्षित ठेवता येईल याचे पर्यायही देतो असे ते म्हणाले.

जर उत्तर कोरियाविरोधात बलाचा वापर केला तर या भागामध्ये प्रचंड जीवितहानी होण्याची भीती आहे. या भूभागामध्ये दक्षिण कोरिया व जपान हे अमेरिकेचे दोन मित्रदेश असल्याने असं करणं जोखमीचं आहे. कुठल्याही कारवाईचे काय परिणाम होणार याची सगळ्यांना कल्पना असून किम यांना घालवणं किवा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रक्षमतेला मर्यादा घालणं आदी उपायही असल्याचे माइक म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग उन यांच्यामध्ये बरीच शाब्दिक चकमक झाली असून एकमेकांना धमकावण्याचे प्रकारही घडले आहेत. अमेरिकेवर अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची धमकी किमनी दिली असून काही क्षेपणास्त्रांची चाचणी थेट जपानवरून उडवून करण्यात आली होती. अमेरिकेनेही गरज पडल्यास उत्तर कोरियावर थेट हल्ला करण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत.

जर अण्वस्त्रांच्या बाबतीत महत्त्वाकांक्षा सोडली नाही, तर उत्तर कोरियाला अमेरिकेचा कोप सहन करावा लागेल असेही सांगून झाले आहे, परंतु किम बधण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेची उघड आव्हानं प्योंग्यांगपर्यंत पोचत असून किम यांनाही या गंभीर परिणामांची माहिती असल्याचे माइक म्हणाले आहेत. 2017 या एकाच वर्षामध्ये उत्तर कोरियानं 20 बॅलिस्टिक मिसाइल्सची चाचणी केली यावरून त्यांची युद्धाची तयारी दिसत आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायानं उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंध लादले. कधी नाही ते उत्तर कोरियाशी चांगले संबंध असलेल्या चीननेही निर्बंधांमध्ये सहभाग घेतला. तरीही उत्तर कोरियानं युद्धतयारी सुरूच ठेवली असून नुकतीच त्यांनी लष्करी सज्जतेची चाचणीही घेतली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये युद्धसज्जतेचं प्रमाण अनेक पटीनं यंदा वाढल्याचं मत निरीक्षकांनी नोंदवलं असून हा येणाऱ्या काळात युद्धाचा इशारा असू शकतो. या सगळ्याचा परिपाक म्हणून सीआयएचे संचालक माइक पाँपेओ यांनी अमेरिकेवर उत्तर कोरिया लवकरच डागू शकते अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र अशी भीती व्यक्त केली आहे.