पँट ओली केल्याप्रकरणी मुलाला रागवणाऱ्या भारतीय पालकांना नॉर्वेतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी मुलाचे वडील चंद्रशेखर वल्लभनेणी यांना १८ महिने तर आई अनुपमा यांना १५ महिन्यांची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
मुलाला मारहाण करणे तसेच त्यांना वारंवार रागविणे या प्रकरणी भारतीय दाम्पत्याला कलम २१९ अंतर्गत आरोप ठेवण्यात आल्याची माहिती ओस्लोच्या पोलीस विभागाचे प्रमुख कुर्त लीर यांनी दिली. मुलाच्या शरीरावर चटके देण्याच्या खुणा असून त्याला पट्टय़ाने मारहाण करण्यात आली असल्याचेही तपासात स्पष्ट झाल्याचे लीर यांनी सांगितले. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी येथील सरकारी वकिलांनीही हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे भारतीय दाम्पत्याच्या अटकेचे समर्थन केले.
दरम्यान, या प्रकरणी दाम्पत्याला योग्य ती मदत करण्याचे आश्वासन नॉर्वेतील भारतीय दूतावासाने दिले आहे. चंद्रशेखर यांच्या वकिलांच्याही आम्ही संपर्कात असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले.