गोध्रा जळीत कांडानंतर उसळलेल्या दंगलींबाबत कोणतेही भाष्य न करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी, राज्यात गेल्या १२ वर्षांत एकही दंगल न झाल्याचे भाष्य शुक्रवारी येथे केले.आपल्या सरकारचा कारभार सर्वाचे कल्याण यावर आधारित आहे, असे मोदी यांनी म्हटले असले तरी त्यांनी गोध्रा कांडानंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात एक हजारहून अधिक जणांचे विशेषत: मुस्लिमांचे बळी गेल्याचा कोणताही संदर्भ दिला नाही. योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमवेत मोदी एकाच व्यासपीठावर होते. प्रत्येकला उत्तम आरोग्य लाभले पाहिजे आणि सर्वाचे कल्याण झाले पाहिजे हा आपला वचननामा असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.गोध्रा कांडानंतर उसळलेल्या दंगलींबाबतच्या प्रश्नांना मोदी यांच्याकडून नेहमीच बगल दिली जात असे. त्यामुळे मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचा उद्रेक झाला असतानाही मोदी यांनी तो थांबविण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असा आरोप त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.