News Flash

‘जय श्री राम’ला विरोध कराल तर इतिहासजमा व्हाल!; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

तृणमूल काँग्रेसची टीका

पश्चिम बंगाल: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष.

सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तो काळ भाजपसाठी सुवर्णकाळ ठरेल, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत म्हणाले होते. तोच धागा पकडताना मात्र  पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वाद ओढवून घेतला आहे. ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाला विरोध करणारी व्यक्ती इतिहासजमा होईल, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. देशभरातील लोक गुजरातपासून गुवाहटी आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत माता की जय आणि जय श्री रामाचा जयघोष करतील. जो कुणी त्याला विरोध करेल तो इतिहासजमा होईल, अशी धमकीच त्यांनी दिली. घोष यांच्या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने टीकेची झोड उठवली.

उत्तर २४ परगना जिल्ह्यातील एका जाहीर सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यासोबत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती चालणार नाही. तुमच्या वाईट सवयी बदला, असे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुनावले. देशभरात भाजपचे ११ कोटी सदस्य आहेत. तृणमूल काँग्रेसमधील आपल्या बंधूंना विनंती करतो की, त्यांनी आपल्या वाईट सवयी बदलाव्यात, अन्यथा मी त्यांना पूर्ण बदलून टाकेन, अशी धमकीच घोष यांनी दिली. घोष यांच्या या धमकीनंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. घोष यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर आहे. भाजप नेत्याच्या तोंडी अशा प्रकारची भाषा अपेक्षित नाही, असे तृणमूलचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे. सत्तेच्या लालसेपोटी ते असे वक्तव्य करत आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे नेते ज्या पक्षाशी संबंधित आहेत, त्या पक्षात असे लोक आहेत, याचे दुखः वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. धर्माच्या नावावर लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचे स्वप्न देशातील जनताच पूर्ण होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. भाजपकडे ११ कोटी सदस्य असले तरी, त्यांच्या या योजनेला सव्वाशे कोटी जनता यशस्वी होऊ देणार नाही. ते धर्माच्या नावाने लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही बंगालची संस्कृती नाही. येथील जनतेचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच समर्थन आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 2:51 pm

Web Title: not chant jai shri ram who will be history bengal bjp chief dilip ghosh
Next Stories
1 नीती आयोगाच्या बैठकीला ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांची अनुपस्थिती
2 यूपीत समर्थकांना सोडवण्यासाठी बजरंग दलाचा पोलीस ठाण्यावर हल्ला
3 दिल्लीत म्हशींची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तरुणांना मारहाण
Just Now!
X