भारत-चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद आहे. पण गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे हा वाद आता विकोपाला गेला आहे. यापुढे चीनवर अजिबात विश्वास ठेवात येणार नाही. कारण भारताला चर्चेमध्ये गुंतवून ठेवत १५ जूनच्या रात्री चीनने आपण भूभाग बळकवण्यासाठी काय करु शकतो, ते दाखवून दिले. अर्थात भारतीय जवानांनी चीनला तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले.

चीनचा फक्त भारताबरोबर सीमावाद आहे असे नाहीय, चीनचा बहुतांश शेजारी देशांबरोबर सीमावाद आहे. तिबेट हा मूळात चीनचा प्रदेश नव्हता. पण लष्करी ताकतीच्या बळावर चीनने जबरदस्तीने हा भाग बळकावला. तैवान बरोबरही त्यांचा असाच संघर्ष सुरु आहे. तैवानचा प्रदेशही जबरदस्तीने त्यांना चीनमध्ये समाविष्ट करायचा आहे. चीनचा भूप्रदेश मिळवण्याची महत्वकांक्षा खूप मोठी आहे. आर्थिक शक्ती बरोबर चीन लष्करी शक्तीचाही चीन वेगाने विस्तार करतोय. चीनच्या महत्वकांक्षाना रोखण्यासाठीच अमेरिकेने आपल्या शक्तीशाली युद्धनौका चीन जवळच्या समुद्रात तैनात केल्या आहेत.

भूतान
पूर्व लडाखच्या आधी भारतीय आणि चिनी सैन्य डोकलाममध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी चीनने डोकलाममध्ये घुसखोरी करुन बांधकाम सुरु केले होते. भारत, भूतान आणि तिबेट या तीन देशांच्या ट्राय जंक्शनवर डोकलामचा भाग येतो. ७३ दिवस दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने होते. भारत आणि चीनमध्ये झालेल्या शांती करारानुसार चीनने नंतर तिथून माघार घेतली.

दक्षिण चीन समुद्र
विपुल साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या दक्षिण चीन समुद्रावरही चीन पूर्णपणे आपला हक्क सांगतो. तिथेही चीनने अनेक कुत्रिम बेटांची उभारणी केली आहे.

दक्षिण चीन समुद्राच्या हक्कावरुन चीनचा तैवान, ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स आणि व्हिएतनाम या देशांबरोबर वाद सुरु आहे.

पूर्व चीन समुद्र
पूर्व चीन समुद्रावरील हक्कावरुन चीनचा दक्षिण कोरिया आणि जपान बरोबर वाद आहे.