डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण हा जागतिक परिणाम असून जगातील बहुतेक देशांच्या चलनाचे दर डॉलरच्या तुलनेत कमजोर झाले आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. शुक्रवारी भारतीय रुपयाने पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत चौऱ्याहत्तरीचा आकडा पार केला. त्यामुळे एका डॉलरची किंमत शुक्रवारी ७४.२३ रुपये इतकी होती. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याची अपेक्षा होती. मात्र, हा दर जैसे थे ठेवल्याने रुपयाने ७४च्या दराचा आकडा पार केला.

दिल्लीत शनिवारी हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समिटमध्ये अरुण जेटली सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपले मत मांडले. जेटली म्हणाले, पुढील दोन दशके भारत उच्च आर्थिक वाढ नियंत्रित करु शकतो. या काळात भारतीय अर्थव्यवस्था चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा चांगली कामगिरी करु शकते.

गेल्या २० वर्षात जागतिक अर्थकारणाच्या तुलनेत चिनची अर्थव्यवस्था आश्चर्यकारकरित्या वर्चस्व गाजवत आहे. असाच बदल पुढील २० वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेबाबतही घडून येईल, त्यामुळे भारतातील मध्यमवर्गाची खरेदी क्षमता केवळ भारतावरच नव्हे तर जागतीक स्तरावर परिणाम करेल. रुपयाच्या घसरणाऱ्या किंमतीमुळे भारतात येणाऱ्या थेट परदेशी गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी खात्रीही त्यांनी यावेळी दिली.

अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी नुकतीच सरकारने उचललेल्या पावलांबाबत सांगताना जेटली म्हणाले, सध्या आर्थिक वर्षातील कर्जाचे टार्गेट ७०,००० कोटींनी कमी करण्यात आले आहे. तर तेल कंपन्यांना त्यांचे उत्पादन १० अब्ज डॉलरने वाढवण्यास परवानगी दिली आहे. मोदी सरकारच्या धोरणांवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जेटली म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत लोकांची भावना नकारात्मक नाही.