कॉंग्रेसच्या पाठिंब्यावरील आम आदमी पक्षाचे सरकार किती दिवस टिकेल, हे सांगता येणार नाही, असे पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी सोमवारी सांगितले.
कॉंग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. या पार्श्वभूमीवर प्रशांत भूषण म्हणाले, आम आदमी पक्ष कॉंग्रेसच्या कोणत्याही अटींचा स्वीकार करणार नसून, स्वतःचे धोरण राबवून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे. जर आमचे सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपने हातात हात घातले, तर ती त्यांची मर्जी असेल. कॉंग्रेसचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता. आमचे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नाही. महिन्याभरासाठी…चार महिन्यासाठी…किंवा सहा महिन्यासाठी…किती दिवस टिकेल, हे पाहावे लागेल.
कॉंग्रेसच्या आठ सदस्यांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी, असे जनमत व्यक्त करण्यात आल्यानंतरच आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.