एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच धरणे आंदोलन पुकारणे हे लोकशाहीच्या परंपरेला लाजिरवाणे आहे. ममतादीदींनी धरणे आंदोलन पुकारून लाज आणली आहे अशी जळजळीत टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्यानंतर योगी आदित्यनाथ हे कारने पश्चिम बंगाल येथे पोहचले. तिथे त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. माझ्यासारख्या संन्यासाला पश्चिम बंगालच्या भूमित येण्यापासून का रोखले गेले? असाही प्रश्न योगी यांनी विचारला आहे.

ममता बॅनर्जी सध्या सीबीआयच्या कारवाईविरोधात धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी एकमेकांचा आदर राखायला हवा. केंद्राचे आणि राज्याचे स्वतंत्र कायदे कानून असून यामध्ये एकमेकांची ढवळाढवळ व्हायला नको. अशा प्रकारे जर संविधान मोडण्याचं काम केलं तर देशात कोणतंही राज्य चालू शकणार नाही अशीही टीका ममता बॅनर्जी यांनी केली. मात्र आता योगी आदित्यनाथ यांनी ममतादीदींवर टीका करत त्यांनी लोकशाहीला लाज आणली असं म्हटलं आहे.