सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला करोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एका दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मागच्या २८ दिवसात देशातील १२ जिल्ह्यांमध्ये करोना व्हायरसचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. मागच्या १४ दिवसात देशातील एकूण ७८ जिल्ह्यांमध्ये एकाही व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झालेली नाही. आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली.

दरम्यान देशातील वेगवेगळया राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर करोनाच्या चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे नेमकी किती लोकांना करोनाची लागण झाली आहे ते समोर येत आहे. मागच्या २४ तासात देशात १४०९ नागरिकांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला देशात एकूण २१,३९३ करोनाग्रस्त रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. अमेरिका आणि युरोपियन देशांच्या तुलनेत भारतात करोना बाधितांची संख्या कमी आहे. भारताने वेळीच उपायोजना केल्यामुळे हे शक्य झाले.