काळा पैसा आणि बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा दावा मोदी सरकार करत आहे. मात्र या निर्णयामुळे तब्बल चार लाख लोकांना रोजगार गमवावा लागला असा गंभीर आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांनी केला आहे.

गुरुवारी संसदेचे कामकाज झाल्यावर कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केल्याची माहिती येचुरी यांनी दिली आहे. नोटाबंदीवर संसदेत चर्चा करण्याची मागणी आहे, पण मोदी चर्चेत सहभागी होत नसल्याने मोदींविरोधात हक्कभंग दाखल केल्याचे येचुरी यांनी सांगितले. नोटाबंदीच्या दुष्परिणामाविषयी येचुरी म्हणाले, नोटाबंदीमुळे देशभरातील ४ लाख लोकांनी रोजगार गमावला आहे. तर वस्त्रोद्योग आणि चर्मोद्योग अशा विविध क्षेत्रात काम करणा-या ३ कोटी १९ लाख लोकांना नोटाबंदीमुळे अजून वेतन मिळालेले नाही असा आरोप त्यांनी केला.

नोटाबंदीमुळे उत्पादनालाही फटका बसला असून यामुळे कामगार वर्गावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. देशातील चार लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. हे सर्व कामगार रोजंदारी तत्त्वावर काम करतात. चलन तुटवडा कायम राहिल्याास बेरोजगार होणा-यांची संख्या वाढेल असे जाणकारांनी सांगितले. रोजंदारीवर काम करणा-या कामगारांचेही बँकेत खाते आहे. पण वर्षाला ५० हजार पेक्षा जास्त रुपये खात्यात जमा झाल्यास दारिद्रय रेषेखालील लोकांना मिळणा-या सुविधा बंद होतील अशी भीती या कामगारांना वाटते. त्यामुळे हे कामगार बँकेत पगार जमा करण्यास विरोध दर्शवतात याकडेही जाणकारांनी लक्ष वेधले.

उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांची सोमवारी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी यंदा उत्पादन कमी होईल असे उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.