News Flash

खूशखबर : आता आठवड्यांतून ४ दिवस खुले राहणार राष्ट्रपती भवन

पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी

राष्ट्रपती भवन (संग्रहित छायाचित्र)

भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचे निवासस्थान अर्थात राष्ट्रपती भवन सर्वसामान्य जनतेसाठी आता आठवड्यातून चार दिवस खुले राहणार आहे. राष्ट्रपती सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चार दिवशी सर्वसामान्य जनतेला राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भवन खुले राहणार आहे.

राजपथवरील गेट क्र. २, हुक्मीमाई मार्गावरील गेट क्र. ३७ आणि चर्च रोडवरील गेट क्र. ३८ या ठिकाणांहून राष्ट्रपती भवनाला भेटीसाठी आलेल्यांना प्रवेश तसेच बाहेर पडता येणार आहे. आगामी काळात वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमांतून राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी बुकिंगही करता येणार आहे. भवन पाहण्यासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये इतके शुल्क आकारले जाते. ८ वर्षांखालील बालकांना येथे प्रवेश निशूल्क आहे. भारतीय नागरिकांना राष्ट्रपती भवनातील प्रवेशासाठी आपले छायाचित्र असलेले ओळखपत्र तर परदेशी नागरिकांना आपला मुळ पासपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.

राष्ट्रपती भवन ही इंग्रजांच्या काळात उभारण्यात आलेली लाल दगडामधील देखणी आणि भव्य वास्तू आहे. यामध्ये दरबार हॉल, मार्बल हॉल, संग्रहालय, नॉर्थ ड्रॉईंग रुम, राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणारा भव्य अशोका हॉल, शाही भोजनासाठीचा बँक्वेट हॉल, विविध देशी परदेशी फुलांचा समावेश असलेले देखणे मुघल गार्डन, गुलाबांच्या फुलांची स्वतंत्र बाग अशा बऱ्याच गोष्टी येथे पाहण्यासारख्या आहेत.

उद्यापासून (गुरुवार) या नव्या नियमांप्रमाणे राष्ट्रपती भवन सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे राष्ट्रपती सचिवालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 5:35 pm

Web Title: now president house will be open for 4 days a week for the general public
Next Stories
1 हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका
2 पटेलांना आरक्षण मग मुस्लिम समाजाला का नाही? – ओवेसी
3 उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनात वाढ, वित्त आयोगाची स्थापना
Just Now!
X