जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली असून या घटना आता येथे नित्याच्याच झाल्याने देशासाठी मोठी समस्या बनली आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या या कारवाया मोडून काढण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जात असून त्याचाच एक भाग म्हणून देशाचे प्रति दहशतवाद पथक असलेले राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडोंना पाचारण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काश्मीरमध्ये एनएसजीच्या तैनातीसाठी केंद्रीय गृहखात्याने हिरवा कंदील दाखवला आहे.

गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी आणि बंडखोरांशी सक्षमपणे लढणे शक्य नसल्याने राज्यातील सुरक्षा रक्षकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक शहीद होत आहेत. या पार्श्वभूमीवर एनएसजीसारख्या खास सुरक्षा पथकासाठी थेट दहशतवाद्यांशी सामना करण्याची मोठी संधी असून त्यांना त्यांचे कौशल्य येथे नेमकेपणाने वापरता येणार आहे. तसेच त्यामुळे स्थानिक सुरक्षा रक्षकांची जीवितहानीही टाळता येईल. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

यापूर्वीच एनएसजीला जम्मू-काश्मीरच्या पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना दहशतवादी मोहिमेसाठी प्रशिक्षित करण्याबाबत विचारण्यात आले होते. दरम्यान, गृह सचिव राजीव गुआबा यांनी ४ मे रोजी एक लिखित निवेदन जारी केले असून त्यानुसार, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीजना निर्देश देण्यात आले आहेत की, बंडखोरांच्या निपातासाठी पहिल्या टप्प्यात ब्लॅक कॅट कमांडोजची श्रीनगर शहरात नियुक्ती करण्यात यावी. तसेच स्थानिक पोलिसांनी त्यांनी प्रशिक्षित करावे. एनएसजी ही भारताची विशेष प्रति दहशतवादी पथक असून यामध्ये १०,००० सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. या सुरक्षा रक्षकांची लष्करातून प्रतिनियुक्ती केली जाते.

गृहखात्याच्या माहितीनुसार, एनएसजी महत्वाची कार्यालये, घरे अशा ठिकाणांना सुरक्षा पुरवणार आहे. जी दहशतवाद्यांकडून किंवा आत्मघाती पथकांकडून टार्गेट केली जाऊ शकतात. अशा कारवायांदरम्यान, सीआरपीएफचे जवान आपल्या जीवाचीही पर्वा करीत नाहीत. मात्र, एनएसजीचे सुरक्षा रक्षक अशा प्रकारे जीवितहानी टाळून दहशतवाद्यांशी मुकाबल्यासाठी विशेष प्रकारे तयार केले जातात. एनएसजीकडे भिंत भेदून माहिती मिळवणारे रडार्स, स्नायपर रायफल्स, कॉर्नर असॉल्ट वेपन्स तसेच त्यांनी दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ठराविक ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचे प्रशिक्षणही घेतलेले असते.