भारत व अमेरिका यांच्यात दोन अधिक दोन संवादाची प्रक्रिया अलीकडेच दिल्लीत पार पडल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल हे ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेले आहेत.

डोव्हल यांनी  ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू केल्या असून, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या फॉगी बॉटम मुख्यालयात मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. ते त्यांचे समपदस्थ जॉन बोल्टन यांनाही भेटणार असून संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. डोव्हल यांच्या भेटीविषयी व्हाइट हाऊस व वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने काहीही सांगितलेले नाही.

परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हिथर नोएर्ट यांनी सांगितले, की भारत हा अमेरिकेचा जवळचा मित्र आहे. हिथर या पॉम्पिओ यांच्यासमवेत गेल्या आठवडय़ात दिल्लीमध्ये दोन अधिक दोन संवादासाठी उपस्थित होत्या. त्यांनी एका सांगितले, की दोन्ही देशात लोकपातळीवर चांगला संपर्क आहे. त्यामुळे भेटीगाठी व संवाद होणार हे उघड आहे.

कम्युनिकेशन्स कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅरेंजमेंट म्हणजे कॉमकासा कराराबाबत त्यांनी सांगितले, की हा महत्त्वाचा करार बराच काळपासून प्रलंबित होता. या करारामुळे रोजगाराला प्राधान्य मिळणार असून लष्करी सहकार्यही वाढणार आहे. डोव्हाल यांच्या भेटीत द्विपक्षीय व सुरक्षा संबंधांवर चर्चा होणार असून, त्यात दहशतवादाच्या मुद्दय़ाचा समावेश राहील.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीची पूर्वतयारीही यात केली जाणार आहे. ट्रम्प यांनी मोदी यांचे भारतभेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. २६ जानेवारी २०१९ रोजी प्रजासत्ताकदिन संचलनासाठी ट्रम्प यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले असले तरी त्यांच्या कोणत्या तारखा उपलब्ध आहेत याच्यावर चर्चा सुरू आहे.