वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय निवडणुकीत ‘एनएसयूआय’ विजयी

वाराणसी : वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयात झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत ‘एनएसयूआय’ने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) धुव्वा उडवत चारही जागा जिंकल्या.

एनएसयूआयच्या शिवम शुक्ला याने अभाविपच्या हर्षित पांडे याचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. तर उपाध्यक्षपदी चंदनकुमार मिश्रा, सरचिटणीसपदी अविनाश पांडे आणि ग्रथपालपदी रजनीकान्त दुबे निवडून आले.

निवडणूक अधिकारी प्रा. शैलेशकुमार मिश्रा यांनी निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर कुलगुरू प्रा. राजाराम शुक्ला यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना संस्कृतमध्ये शपथ दिली. विजयी उमेदवारांनी स्वत:ला वादापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या संकुलात मिरवणूक काढू नये, असे प्रा. शुक्ला यांनी म्हटले आहे.

५०.८२ टक्के मतदान

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना पोलीस संरक्षणात त्यांच्या घरी पाठविण्यात आले. या निवडणुकीत १९५० पैकी ९३१ मुले आणि ६० मुलींनी मतदान केले. मतदानाची एकूण टक्केवारी ५०.८२ इतकी होती.