हैदराबाद महापालिकेच्या वेबसाईटवर अभिनेत्री सनी लिओनीचे नग्न छायाचित्र सोमवारी दिसल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे साईटचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तांत्रिक सहाय्य गटाला हे छायाचित्र तातडीने काढण्यास अपयश आले. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर अक्षरशः तोंडात बोट घालण्याची वेळ आली. सोमवारी संध्याकाळनंतर हे छायाचित्र साईटवरील विविध सेक्शनमधून काढण्यात आले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या एका रिअल टाईम साईटवर सर्वात आधी हे छायाचित्र दिसायला लागले. त्याबद्दल लगेचच तांत्रिक सहाय्य गटाकडे तक्रार नोंदविण्यात आली. तांत्रिक गटाने लगेचच या साईटवरून संबंधित छायाचित्र काढून टाकले. पण नंतर हे छायाचित्र महापालिकेच्या वेबसाईटवर दिसू लागले. तेथील वेगवेगळ्या सेक्शनमध्ये दिसणारे हे छायाचित्र काढून टाकताना तांत्रिक सहाय्य गटाच्या नाकीनऊ आले. हे छायाचित्र खूप उशीरा साईटवरून काढण्यात आले. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. साईट हॅक करून हे छायाचित्र टाकण्यात आले होते की कोणीतरी जाणीवपूर्वक ते टाकले, याचाही उलगडा झालेला नाही. ‘सेंटर फॉर गूड गव्हर्नन्स’कडून या साईटचे तांत्रिक काम सांभाळले जाते. त्यांच्याकडून या घटनेबद्दल काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 26, 2016 11:21 am