जगभरातील करोना रुग्णांच्या संख्येने १ कोटी ७० लाखांचा टप्पा ओलांडला असून सुमारे ९९ लाख लोक बरे झाले आहेत. सध्या जगभरात ३० लाखांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. जॉन हाफकिन विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार गुरुवापर्यंत करोना रुग्णांची संख्या १ कोटी ७० लाख २९ हजार १५५ इतकी झाली आहे. तर ९९ लाख १६ हजार २३० जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जगभरात ६ लाख ६७ हजार ११ जणांचा या साथरोगामुळे मृत्यू झाला आहे. २१०हून अधिक देशांत करोनाने थैमान घातले असून अमेरिका, ब्राझिल, भारत आणि रशिया या देशांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे.

ब्रिटनमध्ये विलगीकरणाच्या दिवसांमध्ये वाढ

करोनाबाधित असणारे किंवा करोनाची लक्षणे असणाऱ्यांच्या विलगीकरण व स्वविलगीकरणाच्या कालावधीमध्ये ब्रिटनने वाढ केली आहे. यापूर्वी सात दिवसांचे विलगीकरण केले जायचे. मात्र आता १० दिवस विलगीकरण करण्याचा निर्णय आणि त्या संदर्भातली नियमावली मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी जाहीर केली.

ब्राझिलमध्ये पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू

ब्राझिलने जगभरातील पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बुधवारी पुन्हा सुरू केली आहे. मार्च महिन्यापासून तेथील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होती. अमेरिकेनंतर करोना रुग्णांची संख्या ब्राझिलमध्ये सर्वाधिक आहे. पर्यटन कालावधीला आरोग्य विमा घेऊन जगभरातील सर्वच पर्यटक ब्राझिलमध्ये येऊ शकतात, असे ब्राझिलच्या सरकारने म्हटले आहे.