क्युबासमवेत अमेरिकेचे गेली पन्नास वर्षे असलेले वितुष्ट बाजूला ठेवून अध्यक्ष बराक ओबामा यांनी मैत्रीचा हात पुढे केला असला, तरी संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा व क्युबाचे अध्यक्ष रौल कॅस्ट्रो यांनी एकमेकांना कोपरखळय़ा मारल्या. मानवी हक्क, अमेरिकेचे आर्थिक र्निबध यावर त्यांनी एकमेकांना चिमटे काढले, त्यामुळे दोन्ही देशांत अजूनही मतभेद कायम असल्याचे चित्र दिसून आले आहे. पंधरा महिन्यांपूर्वी ओबामा व कॅस्ट्रो यांनी शीतयुद्धानंतर संपवलेले राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याचे ठरवले होते. आजच्या पत्रकार परिषदेत ओबामा यांनी कॅस्ट्रो यांना काही खडे बोल सुनावल्याने अशी आक्रमक भूमिका पाहण्याची सवय नसलेले क्युबातील इतर नेते आश्चर्यचकित झाले. कॅस्ट्रो यांनी नंतर आता पुरे झाले असे सांगून पत्रकार परिषद अचानक संपवली. नंतर ओबामा यांनी कॅस्ट्रो यांच्या पाठीवर थाप दिली ते कॅस्ट्रो यांना अवघडून टाकणारे होते, त्यामुळे त्यांनी ओबामांचा हात हातात घेऊन उंचावला. ओबामा व कॅस्ट्रो यांची ऐतिहासिक पत्रकार परिषद हवाना येथील राजप्रासादात झाली त्या वेळी ओबामा यांनी कॅस्ट्रो यांना मानवी हक्कांच्या मुद्दय़ावरून सतत टोकले. लोकशाही व मानवी हक्क यावर आपले मतभेद कायम राहतील असे ओबामा यांनी सांगितले. असे असले तरी ओबामा यांच्या भेटीने क्युबा-अमेरिका यांच्या संबंधातील तणाव निवळला आहे. कॅस्ट्रो यांनी अमेरिकेने लादलेल्या र्निबधांवर सांगितले, की तो आमच्या आर्थिक विकासातील मोठा अडथळा आहे. ओबामा यांनी अमेरिकी नौदलाचा ग्वाटेनामो तळ परत द्यावा कारण ते क्युबाचे बेट आहे. दोन देशांत मतभेद आहेत ते दूर होणार नाहीत.