अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणून जॉन केरी यांची अध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी नियुक्ती केली. ओबामा यांनी स्वत: केरी यांच्या नियुक्तीची घोषणा करताना सांगितले की, अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत परराष्ट्रमंत्रीपदी मुत्सद्दी परराष्ट्र व्यवहाराचा दीर्घ अनुभव असलेले केरी यांची परराष्ट्रमंत्रीपदी निवड करताना मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मावळत्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांची कामगिरीही लक्षणीय होती, असे नमूद करीत ओबामा यांनी त्यांचे आभार मानले.
हिलरी यांच्या प्रकृतीअस्वास्थ्याचा उल्लेख करीत ओबामा म्हणाले, खरे तर त्यांना आज जातीने उपस्थित राहाण्याची तीव्र इच्छा होती. पण आजच त्यांची प्रकृती थोडी सुधारते आहे. गेली चार वर्षे त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र हित जपण्यासाठी जगभर अथक प्रवास केला. त्यांच्याइतका प्रवास त्यांच्याआधीच्या एकाही परराष्ट्रमंत्र्याने केला नव्हता. या प्रवासात त्यांनी मेहनतही न कंटाळता सातत्याने केली. त्यांना पुन्हा देशासाठी काम करायची इच्छा आहे आणि मलाही त्यांच्या अतुलनीय योगदानाची पावती देण्याची इच्छा आहे, असे सूचक उद्गारही ओबामा यांनी काढले.
ओबामा यांच्या निकटच्या वर्तुळातले मानले जाणारे ६९ वर्षीय केरी हे अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या दशकभराच्या मुत्सद्दी कामगिरीचे विरोधी रिपब्लिकन पक्षालाही कौतुक आहे. त्यामुळेच त्यांच्या नावावर संसदेचे शिक्कामोर्तब होण्यात काहीच अडचण येणार नाही.