देशात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरी भागात वेगाने पसरणाऱ्या करोना विषाणूने आता ग्रामीण भागातही पाय रोवले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नियमावलीही जारी केली आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. असं असताना ओडिशातील गंजम जिल्ह्यातील एका गावानं संपूर्ण देशासमोर आदर्श ठेवला आहे. करोनाचा एकही रुग्ण या गावात आढळलेला नाही.

ओडिशातील गंजम जिल्ह्यातील करंजारा गावातील नागरिक करोना रोखण्याचे सर्व नियम सुरुवातीपासूनच पाळत आले आहेत. त्यामुळे जगात करोनाची लाट आल्यापासून आतापर्यंत एकही रुग्ण या गावात आढळलेला नाही. या गावाची लोकसंख्या १ हजार २३४ इतकी आहे. जानेवारी महिन्यात प्रशासनानं या गावातील ३२ नागरिकांची करोना चाचणी केली होती. त्यात कुणालाच करोना नसल्याचं निष्पन्न झालं होतं.

Video : भररस्त्यावर तरुणाला कानशिलात लगावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा माफीनामा, पदही गमावलं!

“गावातील ग्रामस्थांमध्ये करोनाबाबत जनजागृती आहे. गावातील प्रत्येक जण न चुकता मास्क घालतो. सोशल डिस्टन्सिंगची नियमावलीही पाळली जात आहे. त्यांनी अत्यावश्यक वस्तूंचा घरी साठा केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरजेशिवाय ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत”, असं गंजम जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारने नव्या नियमावलीनुसार आशा आणि अंगणवाडी सेविकांना दारोदारी जाऊन करोना स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. करंजारा ग्रामस्थ जागरूक असून कटाक्षाने करोना नियमावली पाळत आहेत.

वसई-विरार : आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण

“जगात करोनाचं संकट आल्यापासून आम्ही काळजी घेत आहोत. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन करत आहोत. आमच्या गावातील काही जण मुंबईत कामाला आहेत. त्यापैकी जे कुणी गावी परतलं त्यांनी १४ दिवस स्वत:ला संस्थात्मक क्वारंटाइन केलं होतं. तसेच कार्यक्रम, समारंभ टाळले आहेत.”, असं करंजारा ग्रामस्थांनी सांगितलं.