ओडिशात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पत्रकारांना ५००-५०० रूपये दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित पत्रकारांना पाकीट देण्यात आले. या पाकिटात ५०० रूपयांच्या नोटा होत्या. ही पाकिटे पाहिल्यानंतर पत्रकारही हैराण झाले. त्यांनी याबाबत आयोजकांकडेही विचारणा केल्याचे बोलले जाते. पत्रकारांनी तक्रार केली असून याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ओडिशातील अंगुल येथील दशहरा मैदानावर आयोजित कार्यक्रमात गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांना प्रेस नोट किट देण्यात आली. अनेक पत्रकारांनी ती उघडल्यानंतर त्यात आणखी एक पाकीट सर्वांना दिसले. त्या पाकिटात ५०० रूपयांची नोट होती. पत्रकारांनी या प्रकाराला विरोध केला. एका पत्रकाराने अंगुल पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. अंगुलचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश राई यांनी याबाबत तक्रार मिळाली असून तपास सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, पत्रकारानी असा प्रकार पहिल्यांदाच घडला नसल्याचे सांगितले. अनेकवेळा केंद्र सरकारचे कार्यक्रम प्रदेश भाजपकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ओडिशामध्ये रस्ते विकासासाठी दीड लाख कोटींची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २१) याच विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी गडकरी ओडिशात आले होते. राऊरकेला येथील बालूघाटमध्ये ब्राह्मणी नदीवर सहापदरी पुल आणि चारपदरी बायपास रस्त्याच्या शिलान्यास करण्यात आला. तसेच त्यांनी एक सभाही घेतली. कंत्राटदाराने निर्धारित वेळेच्या एक दिवस आधी काम केल्यास त्याला एक लाख रूपये पुरस्कार देण्यात येईल पण जर त्याने एक दिवस विलंब केला तर त्याला दीड लाख रूपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे जाहीर सभेत गडकरींनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 12:25 pm