भौतिक, रसायन, वैद्यकीय आणि शांतता पुरस्कारानंतर सोमवारी (दि. १०) अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशवंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंट हॉमस्ट्रॉम यांना प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातील ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. हार्ट आणि हॉमस्ट्राँग यांच्या अर्थशास्त्रातील कॉन्ट्रॅक्ट थिअरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हार्ट आणि हॉमस्ट्रॉम यांनी जगाला दिलेली कॉन्ट्रॅक्ट थिअरी अत्यंत मौल्यवान असून वास्तविक जीवनात विविध संस्था आणि व्यक्तींसाठी महत्वपूर्ण असल्याचे मत दि रॉयल स्वीडिश अॅकडमीने पुरस्कार जाहीर करताना नोंदवले.
मंगळवारी (दि. १०) साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करून पुरस्काराची सांगता होणार आहे. नोबेल पुरस्काराची सुरूवात १८९५ साली झाली पण अर्थशास्त्रातील पुरस्कार देण्याची सुरूवात १९६९ साली करण्यात आली. गतवर्षी हा पुरस्कार ब्रिटनचे अर्थतज्ज्ञ अँगस डिटॉन यांना प्रदान करण्यात आला होता. आठ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (९, ३६ हजार डॉलर किंवा ८, ३४ हजार युरो) व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.