भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी एनडीएचे उमेदवार राहणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते. मात्र आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला हे उमेदवारी दाखल करणार आहेत. ज्यानंतर बुधवारी संसदेत यासाठी मतदान होईल. लोकसभेत एनडीए आघाडीचे बहुमत असल्याने ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.

त्यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी ओम बिर्ला यांना एनडीए कडून लोकसभा अध्यक्षपदासाठी संधी दिल्यागेल्याबद्दल सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले आहे. शिवाय हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानावरून निघालेल्या ओम बिर्ला यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी मला याबाबत माहिती नाही, मी कार्यकारणी अध्यक्षांची केवळ एक कार्यकर्ता म्हणुन भेट घेण्यासाठी गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.