मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वडिलांना पोटच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का सहन करावा लागला. उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात ही दुर्देवी घटना घडली. घरात मुलीच्या लग्नाची धामधूम सुरु असताना राम नरेश यांना मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली. त्यांच्यासाठी तो एक मोठा धक्का होता. राम नरेश यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण घरात मंगल कार्य असल्याने राम नरेश यांनी ह्दयावर दगड ठेवला व विवाहाचे सर्व विधी पूर्ण होईपर्यंत कोणालाच काही कळू दिले नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलीला सासरी पाठवण्याचा विधी झाल्यानंतर नातेवाईक, पाहुणे मंडळींना मुलाच्या अपघाती निधनाची माहिती देताना राम नरेश बेशुद्ध झाले. लग्नाच्याच दिवशी नवरीमुलीच्या भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच एका क्षणामध्ये घरातले मंगलमय वातावरण दु:खामध्ये बदलून गेले. कानपूर देहातमध्ये मंगलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारीयाझाला गावात बुधवारी ही दुर्देवी घटना घडली.

लग्नाला काही तास उरलेले असताना भरधाव वेगात पळणाऱ्या ट्रकच्या धडकेत हिमांशू यादवचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हिमांशू लग्नाचे साहित्य घेऊन बाईकवरुन हॉलच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने धडक दिल्यानंतर हिमांशू बाईकवरुन फेकला गेला. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या हिमांशूला स्थानिक जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन गेले. पण त्याचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी लगेच राम नरेश यांना याबद्दल सांगितले व मुलीच्या लग्नाचे विधी पूर्ण होईपर्यंत कोणाला काही सांगू नका असा सल्लाही दिला. राम नरेश यांनी सुद्धा परिस्थिती ओळखून दु:ख मनातच दडवून ठेवले. चेहऱ्यावर दु:खाचे कोणतेही भाव न आणता मुलीच्या विवाहाच्या विधीमध्ये सहभागी झाले. मुलीच्या लग्नाला शेकडो पाहुणे उपस्थित होते. पाहुणे, मित्रमंडळी हिमांशूबद्दल विचारणा करत असताना राम नरेश यांनी वेळ मारुन नेली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी मुलीला सासरी पाठवण्याचा विधी झाल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना मुलाच्या मृत्यूची बातमी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On daughters wedding day son dies in accident father silent till rituals were complete dmp
First published on: 22-11-2019 at 14:35 IST