पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत.

आणखी वाचा- मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, संख्या वाढण्याची भीती

आणखी वाचा- जवानांचे शौर्य व त्याग देश कधीच विसरणार नाही : राजनाथ सिंह

सीमेवर एकूणच युद्धजन्य परिस्थिती आहे. देशाच्या सीमेवर नेमके काय सुरु आहे? त्याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

आणखी वाचा- पेट्रोलिंग पॉईंट १४ वर नेमकं काय घडलं? भारतीय जवानांवर खिळयांनी हल्ला

पंतप्रधान का शांत आहेत?
गलवाण खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. “आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली?,” असा सवाल राहुल गांधी मोदींकडे उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. “पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?,” असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.