हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्यांतर्गत पांगरा ढोणे येथील तुकाराम ढोणे आणि मानिक सुर्यवंशी या दोन शेतकर्‍यांचे तिसर्‍या दिवशीही शेतात सरणावर बसून उपोषण सुरू आहे. ऊसाला भाव मिळावा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, अशा विविध मागण्यासाठी सरण रचून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.

मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु आहे. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी भेट घेण्यासाठी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर गेले होते. त्या शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र शेतकर्‍यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडत उपोषणातून माघार घेण्यास नकार दिला. उपोषणकर्ते तुकाराम ढोणे यांची प्रकृती खालावली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकताच हिंगोली दौरा केला होता. मात्र त्यांच्या दौऱ्यानंतरही शेतकऱ्यांचा काहीही फायदा झाला नाही, अशी टीका माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केली. शासनाचा एखादा मंत्री जिल्ह्यात आला म्हणजे त्या जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने, उद्योग हे चालू होण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून विचार विनिमय होणे गरजेचे असते. तसे काहीही दौर्‍यात दिसून आले नाही. राज्यातील सहकार क्षेत्र चांगलेच अडचणीत आले असतांना सहकारमंत्री जिल्ह्यात फिरतात. हे जरी खरे असले तरी पण सुतगिरण्या, साखर कारखान्याची अवस्था वाईट आहे. मात्र, दुध संघ बरे चालू होते, त्यासाठी आता नवनवीन नियम व अटी करण्यात येत आहेत. म्हणून ते सुध्दा अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.