काश्मीर खोऱ्यातील गांदरबलमध्ये चकमकीदरम्यान सुरक्षा दलाला एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास चकमक सुरु झाली होती. गांदरबलमधील गुंड परिसरातील एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने तिथे जाऊन परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला, यावर जवानांनी दिलेल्या चोख प्रतित्त्युरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला.

या अगोदर सोमवारी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शिवाय, घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा व स्फोटकं देखील जप्त करण्यात जवानांना यश आले आहे. तर, रविवारी सायंकाळी देखील जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. यावरून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाचे ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अजूनही सुरुच असल्याचे दिसत आहे.

या अगोदर श्रीनगर येथील मौलाना आझाद रोडवरील मार्केट परिसरात ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले होते. तसेच, जम्मू-काश्मीरमधील सोपार भागात पोलिसांना लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. विशेष म्हणजे यावेळी मोठ्याप्रमाणावर शस्त्र व स्फोटकं देखील जप्त करण्यात आली होती. तारिक चन्ना असे या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असुन तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे नोंद आहे.