News Flash

Cyclone Tauktea : कशी घडली ‘पी-३०५’ दुर्घटना? उच्चस्तरीय समितीच्या चौकशीत होणार खुलासा!

पी-३०५ दुर्घटना कशी घडली? याची चौकशी करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे.

तौते चक्रीवादळाच्या तडाख्यात बॉम्बे हायजवळ तेल उत्खनन करणाऱ्या पी-३०५ या तराफ्याला दुर्घटना घडली. यामध्ये असलेल्या एकूण २७३ सदस्यांपैकी आत्तापर्यंत १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून २६ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अजूनही उर्वरीत सदस्यांचा शोध सुरू आहे. मात्र, ही दुर्घटना नेमकी का घडली? यामागे दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का? याचा तपास करण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक केली आहे. ONGC साठी तेल उत्खननाचं कंत्राट घेतलेल्या कंपनीसाठी तेल उत्खनन करणारा हा तराफा ऐन वादळात सापडला कसा? तो भरकटला कसा? आणि अंतिमत: बुडाला कसा? याची चौकशी करून ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

जहाज माघारी बोलावण्याच्या सूचना देऊनही…!

तौते चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याआधीच किनारी भागांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. मच्छीमारांनाही समुद्रातून माघारी बोलावण्यात आले होते. त्याचप्रमाणे तटरक्षक दलाने ONGC आणि ऑफशोर डिफेन्स अॅडव्हायजरी ग्रुप अर्थात FODAG यांना जहाजे पुन्हा बंदरावर बोलावण्याच्या सूचना केल्या होत्या, अशी माहिती देखील समोर आली आहे. मात्र, असं असताना देखील तेल उत्खननाचं काम सुरूच कसं ठेवण्यात आलं? यावर चर्चा सुरू झाली आहे. “तटरक्षक दलाने ओएनजीसी आणि एफओडीएजीला समुद्रातून सर्व जहाजे परत बोलावण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही ओएनजीसीने दिलेल्या माहितीचे पालन का केले नाही, हा एक प्रश्नच आहे,” असे तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडंट जनरल आनंद बडोला यांनी सांगितले आहे.

 

पी-३०५ नेमकं बुडालं कसं?

चक्रीवादळाआधी एकूण ४ हजार २२१ बोटी किनाऱ्यावर आल्या होत्या. पण अफकॉन्सने (ज्या कंपनीकडे ONGC साठी तेल उत्खननाचं कंत्राट आहे) आपली माणसं समुद्रात पाठवली होती. या सगळ्या प्रकरणात आता ओएनजीसीनं अफकॉन्सला दोषी ठरवलं आहे. चक्रीवादळात अडकलेल्या अफकॉन्सच्या तीन महाकाय तराफ्यांपैकी पी-३०५ हे बुडाले. त्यामध्ये आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

Cyclone Tauktae: तटरक्षक दलाने पाच दिवस आधीच ओएनजीसीला दिली होती जहाजं परत बोलवण्याची सूचना

उच्चस्तरीय समिती महिन्याभरात सादर करणार अहवाल!

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कोण हे शोधण्याचं काम पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवलं आहे. या समितीमध्ये शिपिंगचे महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन्सचे महासंचालक एससीएल दास आणि संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव नाझली जाफरी शायीन यांचा या समितीमध्ये समावेश आहे. नेमका हा तराफा बुडाला, तेव्हा घडलं काय? याची चौकशी या समितीमार्फत केली जाणार आहे. महिन्याभरात ही समिती आपला अहवाल सागर करणार आहे. या चौकशीदरम्यान नवीन आवश्यक सदस्याचा समावेश किंवा सदस्य नसलेल्या तज्ज्ञाचा सल्ला समिती घेऊ शकते, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 10:42 pm

Web Title: ongc barge news today high level committee to probe p 305 incident pmw 88
Next Stories
1 ‘तौते’ शांत झालं, आता ‘यास’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा!
2 “केंद्राला त्यांच्या प्रतिमेची काळजी आहे, पण आम्हाला आमच्या मुलांची चिंता आहे!”
3 नागरिकांच्या मानसिकतेसाठी इम्फालमध्ये आता ना अँब्युलन्सचा सायरन वाजणार, ना लाऊडस्पीकर
Just Now!
X