पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी युद्धाची भाषा करणारे अशिक्षित असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत फक्त अशिक्षित लोक युद्धाची भाषा करत आहेत. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न असून त्यांच्यासमोर चर्चेचा पर्याय असताना युद्धाचा विषय उद्भवेल असे मला वाटत नाही असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर धडकवली. या घटनेत भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतातून पाकिस्तानला अद्दल घडवण्याची बदला घेण्याची मागणी होत आहे.

हल्ल्याच्या दुसऱ्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामाच्या हल्लेखोरांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने हल्ला केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची बाजू मांडली असून एक संधी देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. ‘इम्रान खान यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला आहे. त्यांना एक संधी दिली गेली पाहिजे’, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी पुराव्यांविना पाकिस्तानला जबाबदार ठरवलं जात नसल्याचंही सांगितलं.