पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावावरून भाजप नेत्यांची उलट-सुलट वक्तव्ये थांबवण्याची चिन्हे नाहीत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नाव पुढे केले होते. मात्र पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी हेच सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
अडवाणी यांच्या मताच्या विपर्यास केल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगतानाच मोदी देशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत यात दुमत नसल्याचे सांगितले. अर्थात भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्षाचे संसदीय मंडळ ठरवेल असे स्पष्ट करत या प्रश्नावर सोडवणूक करून घ्यायचा प्रयत्न केला.
शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या नावावरून सुरू झालेली चर्चा पाहता त्यावरून वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अडवाणी यांनी आपल्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. पहिल्यांदा त्यांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली. त्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह आणि गोव्याचे मनोहर पर्रिकर यांचे कौतुक केले. त्यामुळे आपली व्यक्तिगत स्तुती अडवाणींनी केली नाही, असे भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.