‘ऑपरेशन ब्लूस्टार’ला आज ३५ वर्ष पूर्ण होत असताना अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्याची घटना घडली आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी एसजीपीसी टास्क फोर्स आणि जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान करुन आलेल्या शिखांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. भिंद्रनावलेचा टी-शर्ट घातलेल्या शिखांनी ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी एसजीपीसीने सुवर्ण मंदिराच्या परिसरात टास्क फोर्सची तैनाती केली आहे. ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ला आज ३५ वर्ष होत असल्याने अमृसरला किल्ल्याचे स्वरुप आले आहे. संपूर्ण शहरात जवळपास ३ हजार सुरक्षा रक्षकांची तैनाती करण्यात आली असून संवेदनशील भागांवर पोलिसांची अत्यंत बारीक नजर आहे.

सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी जून १९८४ मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लूस्टार केले होते. अमृतसर शहरात प्रवेशाच्या आणि बाहेर निघण्याच्या सर्व मार्गांवर पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे.

पंजाबमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी घातपात घडवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सोमवारी भारत-पाक सीमेवर एका तपासणी नाक्यावर दुचाकीवरुन आलेला एक जण बॅग टाकून पळाला. त्यामध्ये दोन हँड ग्रेनेड होते. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सर्तक झाल्या आहेत.