News Flash

‘ऑपरेशन डार्क थंडर’चे सारथ्य मराठी सुपुत्राकडे..

लेफ्टनंट जनरल निंभोरकरांच्या कौतुकासाठी मुख्यमंत्री मध्यरात्री भेटीला

ले. जनरल राजेंद्र निंभोरकर

लेफ्टनंट जनरल निंभोरकरांच्या कौतुकासाठी मुख्यमंत्री मध्यरात्री भेटीला

सीमापार घुसून केलेल्या आणि किमान ५० दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या ‘ऑपरेशन डार्क थंडर’मध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर या वरिष्ठ मराठी लष्करी अधिकाऱ्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली असल्याची माहिती समोर आली आहे. या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आवर्जून गेले होते.

मूळचे वर्धा जिल्ह्य़ातील आष्टी (शहीद) तालुक्यातील वर्धापूरचे असलेले निंभोरकर यांना नुकतेच लष्कराच्या दारूगोळा खरेदी विभागाचे प्रमुख (‘मास्टर जनरल ऑर्डनन्स’: ‘एमजीओ’) म्हणून मुख्यालयात बढती मिळाली आहे, पण तत्पूर्वी ते जम्मूस्थित सोळाव्या कोअरचे मुख्य अधिकारी होते. त्याचबरोबर १५ पंजाब बटालियनचे प्रमुख, इन्फंट्री ब्रिगेडचे प्रमुख, दहशतवादविरोधी मोहिमेचे प्रमुख या नात्याने त्यांना नियंत्रण रेषेची खडान्खडा माहिती आहे. त्यांच्या या क्षमतेचा, कौशल्याचा ‘ऑपरेशन डार्क थंडर’मध्ये आवर्जून उपयोग करून घेण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग, लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) रणबीरसिंग यांच्यासमवेत लेफ्टनंट जनरल निंभोरकर मोहिमेच्या नियोजनात आणि प्रत्यक्ष सूत्रसंचालनात आघाडीवर होते, किंबहुना प्रत्यक्ष सारथ्य त्यांच्याकडे असल्याने कारवाईदरम्यान ते ‘साऊथ ब्लॉक’मधील ‘वॉर रूम’मधून नियंत्रण करीत होते.

द्रास सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईसाठी निंभोरकर यांना सेवा पदक, विशिष्ट सेवा पद, अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबच देश संरक्षणामध्ये आहे. थोरले बंधू सुधीर हे हवाईदलामध्ये ग्रुप कॅप्टन आहेत, तर धाकटे बंधू विलास यांनी नौदलाची पंधरा वर्षे सेवा बजावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 2:29 am

Web Title: operation dark thunder
Next Stories
1 पाकच्या १२ सैनिकांचा खात्मा
2 मराठा समाजाच्या मोर्चाबाबत शहांची मुख्यमंत्र्यांबरोबर खलबते
3 काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पाचव्यांदा उल्लंघन
Just Now!
X