बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेवर आल्यास विविध वर्गासाठी असलेले आरक्षण रद्द होईल आणि अल्पसंख्य असुरक्षित होतील ही भावना जनतेच्या मनांत उतरविण्यात बिहारमधील विरोधी पक्ष यशस्वी झाला, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे अन्य मागास वर्गातील अनेक जातींचा अतिमागास वर्गात आणि आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गातील काही जातींचा अनुसूचित जाती-जमातींमध्ये समावेश करण्याचा निर्णय नितीशकुमार सरकारने घेतला. त्यामुळेही महाआघाडीला मतदारांनी पाठिंबा दिला, असेही पासवान म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाबाबत विचारले असता पासवान म्हणाले की, केवळ हाच मुद्दा कळीचा ठरलेला नाही. मात्र महाआघाडीने त्या विधानाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली, असे पासवान एका पत्रकार परिषदेत म्हणाले.