बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नितीशकुमार यांची भाजपसोबत जवळीक वाढत चालली आहे, अशी जोरदार चर्चा राष्ट्रीय राजकारणात रंगली होती. मात्र, माझे विरोधक अशाप्रकारचा अपप्रचार करून माझा राजकीय बळी देऊ पाहत, असा दावा नितीशकुमार यांनी केला आहे. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष एकजुटीने उभे ठाकले असताना, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले होते. बेहिशेबी संपत्तीवर टाच आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले होते. बेहिशेबी संपत्तीवर कारवाई करण्याची हीच खरी वेळ आहे, असे नितीशकुमार यांनी म्हटले होते. सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देण्यामागे नितीश यांचे काही राजकीय हेतू असल्याचे सांगितले जात आहे. एक म्हणजे या माध्यमातून नितीश यांना बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव यांच्यावर वचक ठेवायचा आहे. दुसरे म्हणजे नोटाबंदीला पाठिंबा देऊन मोदींच्या भक्तमंडळीबरोबरच मध्यमवर्गीयांच्या मनात अलगद स्थान मिळविण्याचा नितीश यांचा इरादा आहे. दरम्यान, या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला वेसण घालण्याची नितीश यांची रणनीती काहीप्रमाणात यशस्वीही ठरताना दिसत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात पाटण्यात निघणाऱ्या मोर्चापासून राजदच्या बहुतेक नेत्यांनी दूर राहण्याचा घेतलेला निर्णय हा त्याचीच प्रचिती देणार असल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावर काँग्रेसबरोबर एकत्र येण्यास राजदचे नेते टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत नोटाबंदीविरोधात ठाम भूमिका घेण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र, लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र तेजस्वी व तेजप्रताप हे प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले नव्हते. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी खासगी चर्चेत आपल्या मुलांनाही नोटाबंदीच्या मुद्द्यावर नितीश कुमार यांचे अनुकरण करा, असा सल्ला दिल्याचे समजते.

दरम्यान, दुसरीकडे मात्र नोटाबंदीचे समर्थन केल्यामुळे नितीश कुमार आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. याच पार्श्वभूमीवर नितीश आणि अमित शहा यांच्यामध्ये गुरगावच्या फार्म हाऊसमध्ये झालेल्या कथित भेटीची सध्या राजधानीत गरमागरम चर्चा आहे. मात्र, नितीश कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून विरोधकांकडून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. काल पाटण्यात झालेल्या आमदारांच्या बैठकीत नितीश कुमार यांनी याबद्दल भाष्य केले. मी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो, अशा काही निराधार बातम्या पसरविल्या जात आहेत. केवळ नोटाबंदीच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शविला म्हणून भाजप आणि माझी जवळीक वाढली, असा अर्थ काढला जात आहे. अशाप्रकारच्या अफवा पसरवून विरोधक माझा राजकीय बळी देऊ पाहत आहेत, असा आरोप नितीश यांनी केला. दरम्यान, या बैठकीला उपस्थित असणाऱ्या एका आमदाराने नितीश या प्रचारामुळे चिंतीत असल्याचे सांगितले. नितीश कुमार यांनी नोटाबंदीला समर्थन दिले असले किंवा बेहिशेबी मालमत्तांवर कारवाई करण्याचा मार्ग सुचविला असला तरी नोटाबंदीच्या अंमलबजावणीबाबत त्यांचे सरकारशी मतभेद आहेत. याशिवाय, असहिष्णुता आणि संघराज्यीय पद्धतीचा आदर न करण्याच्या मुद्द्यावरून माझा भाजपला विरोध असल्याचेही नितीश यांनी आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केले.