तुतिकोरीन येथे पोलीस गोळीबारांत ११ जण ठार झाले त्याबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आपले मौन सोडले आणि तुतिकोरीन येथील हिंसाचाराला प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी केला.

राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावरून प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर काही समाजकंटकांनी स्टरलाइट प्रकल्पविरोधी निदर्शनांमध्ये घुसखोरी केली आणि हिंसाचार घडविला, असा दावा पलानीस्वामी यांनी केला.

तुतिकोरीन येथे घडलेला प्रकार दुर्दैवी आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी, पोलीस गोळीबारांत ठार झालेल्यांना आदरांजली वाहिली. सदर प्रकल्प बंद करण्यासाठी यापूर्वी झालेली निदर्शने शांततेत पार पडली होती, असेही ते म्हणाले.

या वेळी निदर्शनांना हिंसक वळण लाभले, काही राजकीय पक्षांनी त्याला चिथावणी दिली आणि समाजकंटक या निदर्शनांमध्ये घुसले. राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी जाणूनबुजून िहसाचार घडविण्यात आला. सदर प्रकल्प बंद करण्यासाठी सरकार २००३ पासून प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.

सदर प्रकल्प बंद करण्यासाठी सर्व कायदेशीर पावले उचलण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे त्याबाबतचे खटले उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.