मुंबई तसेच दिल्ली आणि कोलकाता येथील ‘बीएसएनएल’ आणि ‘एमटीएनएल’ इमारतींमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी दिला. एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या सर्व इमारतींचे आग आणि सुरक्षाविषयक ऑडिट करण्याचा आदेशही दूरसंचार विभागाने काढला आहे.

सोमवारी झालेल्या घटनेत वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीचे आगीत नुकसान झाले होते. त्याच दिवशी कोलकात्यातही बीएसएनएलच्या सॉल्ट लेक इमारतीला तसेच दिल्लीतही किडवाई भवन येथील एमटीएनएलच्या इमारतीलाही आग लागलेली होती. या आगींमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या तीनही घटनांची गंभीर दखल केंद्रीय मंत्र्यांनी घेतली असून या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला लागलेली आग तब्बल बारा तासांनी आटोक्यात आणली गेली.

आगीमुळे १५ हजार टेलिफोन तसेच ८ हजार इंटरनेट ग्राहकांच्या सेवेत अडथळे निर्माण झाले होते. ही सेवा चार दिवसांत पूर्ववत केली जाणार असल्याचे एमटीएनएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सेवा पूर्ववत करण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे तज्ज्ञ अहोरात्र काम करत असल्याचे दूरसंचार विभागाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एमटीएनएल इमारतीच्या आगीची चौकशी करण्याची विनंती खासदार पूनम महाजन यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेऊन केली.