विशाखापट्टनम येथील एलजी पॉलिमर्सचा प्रकल्प जप्त करण्याचा आदेश स्टायरिन वायुगळती प्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने  दिला असून याच ठिकाणाहून वायुगळती झाली होती. सरकारनियुक्त समिती सदस्यांशिवाय कुणालाही या आवारात प्रवेश निषिद्ध करण्याचे आदेशही  न्यायालयाने दिले असून कंपनीच्या संचालकांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बावीस मे रोजी जारी केलेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, कंपनीच्या संचालकांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही. त्यांचे पासपोर्ट परत देण्यात येऊ नयेत असेही सांगण्यात आले आहे. मुख्य न्यायाधीश जे. के. माहेश्वरी व न्या. ललिता कनेगंटी यांनी लोकहिताच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, या कंपनीचा प्रकल्पच जप्त करण्यात येत असून तेथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ चौकशी समितीचे लोक तेथे जाऊ शकतील. कंपनीच्या संचालकांनाही तेथे जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.  ७ मे रोजी एलजी पॉलिमर्स कंपनीतून स्टायरिन वायूची गळती झाली होती त्यात १२ जण मरण पावले होते, तर अनेकजण आजारी पडले होते. विशाखापट्टनमनजीक आर. आर. व्यंकटापूरम येथे ही दुर्घटना झाली होती. हा कारखाना सध्याच्या ठिकाणाहून दुसरीकडे हलवावा अशी मागणी  याचिकेत केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकल्पाची कुठलीही सामग्री परवानगीशिवाय हलवता येणार नाही. दरम्यान कंपनीच्या संचालकांनी  त्यांचे पासपोर्ट भारतीय अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय ते परत दिले जाणार नाहीत.