मोठ्या कष्टानं एखादी गोष्ट मिळवल्यानंतर ती आपल्याच चुकीमुळे गमवावी लागते तेव्हा मोठा त्रास होतो. आग्र्यातील एका अनाथ विद्यार्थ्यासोबत अशीच घटना घडली असून त्याला याचा त्रासही होत आहे. जेईई परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये सिद्धांत बत्रा याने २७० वा क्रमांक मिळवल्यानंतर त्याला आयआयटी मुंबईमध्ये आवडत्या कोर्ससाठी जागा मिळाली होती. मात्र, चुकीचा समज झाल्याने त्याने एका लिंकवर क्लिक केल्यानं ती जागा त्याच्या हातून गेली. इतकी मोठी संधी हातून गेल्यानंतर आता त्याला केवळ सुप्रीम कोर्टाचाच आधार आहे.

आग्रा येथील रहिवासी असलेला सिद्धांत बत्रा याने IIT JEE (Advanced) २०२० परीक्षेत ऑल इंडिया २७० रँक मिळाली होती. कठीण परिस्थितीतून मोठ यश मिळवणारा हा १८ वर्षीय तरुण यामुळे चर्चेत आला होता. सिद्धांतच्या आईने एकटीने त्याचे पालनपोषण केले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्यांचेही निधन झाले. अनाथ पेन्शनवर जगणाऱ्या आणि आपल्या आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या सिद्धांतला आयआयटी मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकसाठी जागा मिळाली होती. पण एका छोट्याशा चुकीमुळे त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊनही अचानक विरुन गेलं.

चुकून गमावली जागा

१८ ऑक्टोबर रोजी त्याने जागा वाटपाचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. नंतर आपला रोल नंबर अपडेट झाल्याची माहिती मिळताना त्याच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर एक लिंक समोर आली. यावर ‘सीट फायनल अँड विड्रॉ’ असं लिहिलं होतं. त्याने असा विचार करुन त्यावर क्लीक केलं की त्याला मनासारखी जागा मिळाली आहे. त्यामुळे त्याला आता पुढच्या राऊंडची गरज नाही. मात्र, १० नोव्हेंबर रोजी त्याचं नाव इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या कोर्ससाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत नव्हतं, हे पाहून त्याला धक्काच बसला.

सुप्रीम कोर्टात केली याचिका दाखल

आयआयटी मुंबईत या कोर्ससाठी ९३ जागा होत्या. सिद्धांतने आपली चूक सुधारण्यासाठी मुंबई हायकोर्टात अपिल केलं होतं. ज्यावर १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली आणि कोर्टाने आयआयटीला त्यावर विचार करण्यास सांगितलं. नियमांनुसार आयआयटीला असं करण्याचा अधिकार नाही, असं सांगत आयआयटीने यासाठी नकार दिला. यामुळे या प्रवेशासाठी आता सिद्धांतला पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षेला बसावं लागणार आहे. त्यामुळे सिद्धांतने आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आपल्यासाठी आयआयटी मुंबईत एक वाढीव जागा वाढवण्यात यावी, या मुद्द्यावर त्याने कोर्टात अर्ज केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.