अमेरिकेच्या नौदलातील माजी सैनिकाने अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारल्याचा दावा केला आहे. रॉब ओनील असे या सैनिकाचे नाव असून ही गोपनीय माहिती उघड केल्याचे त्यांना महागात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आपण झाडलेली गोळी ओसामाच्या कपाळाला लागली होती, असे ओनीलने एका मुलाखतीत म्हटले आहे. ही मुलाखत पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार असल्याचे समजते. मात्र अमेरिकेतील संरक्षण मंत्रालय ओनील व मुलाखत प्रसिद्ध करणा-या प्रसारमाध्यमाविरोधात कारवाई करण्याचा विचार सुरु केला आहे. कारण, गेल्या तीन वर्षांपासून या मिशनमध्ये असलेल्या २३ जवानांची माहिती अमेरिकेने गोपनीय ठेवली होती. तसेच या संपूर्ण मिशनबाबत कमालीची गुप्तता देखील बाळगण्यात आली होती.
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणाऱया ओसामाचा खात्मा करण्याचा निर्धार करत २०११ साली अमेरिकेने गुप्त मोहिम आखून पाकिस्तानची लष्करी छावणी असलेल्या अबोटाबाद शहरात नौदलाच्या विशेष पथकाला पाठवले होते. तेथे दडून बसलेल्या लादेनचा खात्मा करून या विशेष पथकाने ही मोहिम पूर्णत्वाला नेली होती. याआधी लादनेला नेमके कशा पद्धतीने मारण्यात आले याविषयी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. तसेच या मोहिमेत किती जणांचा सहभाग होता याविषयी कोणताही तपशील बाहेर आला नव्हता.