आपल्या देशाचे जवान बोलत नाही तर कृती करतात, तसेच आपल्या संरक्षण मंत्र्यांचे आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रिकर यांची स्तुती केली आहे. अन्य देशांप्रमाणे आपणही जिथे देशाचे रक्षण करणारे जवान दिसतील त्यांना सलाम करावे असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मध्यप्रदेशमधील भोपाळमधील लाल परेड मैदानात शौर्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. जवानांची मानवंदना द्यायला मिळाली हे माझे भाग्यच आहे असे सांगत नरेंद्र मोदींनी सैन्याची पाठ थोपटली. आपण जेव्हा जवानांविषयी बोलतो, त्यावेळी आपण त्यांचा गणवेश, पदक याविषयी बोलतो. पण आपण त्यांच्यातील माणूसकीदेखील बघितली पाहिजे असे मोदी म्हणाले. काश्मीरमधील पूर असो किंवा उत्तराखंडमधील महाप्रलय स्वतःच्या प्राणाची चिंता न करता हे जवान लोकांच्या मदतीसाठी धावले असेही त्यांनी सांगितले. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी राबवलेल्या मोहीमेचा उल्लेख करत मोदी म्हणाले,येमेनमध्ये भारतीयांसोबतच सैन्याने पाकिस्तानी नागरिकांचीही सुटका केली होती. यामधून सैन्यातील माणूसकीचे दर्शन घडते असे त्यांनी सांगितले. आपण सुखात झोपलो की सैन्याच्या जवानांना समाधान मिळते. पण जर जागायच्या वेळीपण आपण झोपूनच राहिलो तर जवान माफ करत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी आमच्यावर टीका होत होती, मोदी झोपून असतात काही करत नाही, पण सैन्य जसे बोलत नाही तसे आमचे संरक्षणमंत्रीदेखील बोलत नाही असे त्यांनी सांगितले.