आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सह आजार असलेले लोक तसेच पन्नाशीवरील नागरिक अशा लक्ष्य समूहातील तीस कोटी लोकांचे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण तातडीने करण्याची गरज आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी व्यक्त केली. कोविड १९ उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या बैठकीत ते बोलत होते. भारतातील करोना रुग्णांची संख्या १ कोटीचा टप्पा ओलांडून गेली असतानाच्या टप्प्यावर ही आढावा बैठक घेण्यात आली.

वर्धन यांनी सांगितले, की करोना साथीच्या वाढीचे प्रमाण २ टक्क्य़ांच्या खाली गेले असून मृत्यू दर जगात सर्वात कमी म्हणजे १.४५ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा ९५.४६ टक्के असून १० लाख चाचण्या करण्याच्या धोरणामुळे आवर्ती रुग्णवाढीचा दर ६.३५ टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील सणासुदीच्या काळानंतरही करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही. याचे कारण चाचण्यांचे वाढते प्रमाण हे आहे.

केरळ : निवडणुकांनंतर रुग्णसंख्येत वाढीची शक्यता

तिरुअनंतपूरम : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी करोनाचा पुन्हा फैलाव होण्याबाबत इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे जनतेने अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही शैलजा यांनी केले आहे.

करोनावरील लस उपलब्ध होईपर्यंत जनतेने स्वविलगीकरणात राहावे आणि धीर धरावा, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. बच्चेकंपनीला घेऊन खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची, विवाह समारंभात मोठय़ा संख्येने हजर राहण्याची किंवा महोत्सवांमध्ये सहभागी होण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.