दिल्लीत २३.४८ टक्के लोकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यातील बहुतांश लक्षणविरहित असल्याचे सीरो सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजधानीतील सुमारे ७७ टक्के रहिवाशांना अजूनही करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असून प्रतिबंधात्मक उपायांचा वापर अत्यावश्यक असल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

एखाद्या व्यक्तीला विषाणूची बाधा झाली असेल तर, विषाणूविरोधात लढण्यासाठी तिच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण होतात. या प्रतिपिंडाचा शोध घेण्यासाठी सीरो सर्वेक्षण केले जाते. दिल्लीमध्ये २७ जून ते १० जुलै या काळात ११ जिल्ह्यांमध्ये २१ हजार ३८७ व्यक्तींची इलायझा चाचणी केली गेली. त्यात सुमारे २४ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंडे आढळली. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) या संस्थांनी सीरो सर्वेक्षण केले.

दिल्लीतील हे सर्वेक्षण जूनच्या मध्यात करण्यात आले असून या दिवसांमध्ये राजधानीत प्रतिदिन ३ हजार रुग्णवाढ होत होती. जुलै अखेपर्यंत काही लाख रुग्ण दिल्लीत आढळतील अशी भीती व्यक्त केली जात होती. घनदाट लोकसंख्या असलेल्या दिल्लीतील काही निवासी भागांमध्ये ज्या काळात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत होती तेव्हाही दिल्लीत फक्त २४ टक्के लोक करोनाबाधित झाले, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले.

देशात करोनाचा प्रादुर्भाव होऊन सहा महिने झाले असून आता तर दिल्लीतील परिस्थिती आटोक्यात आणली गेली असून गेल्या चोवीस तासांमध्ये सुमारे ९५० रुग्णांची वाढ झाली आहे. प्रतिदिन रुग्णवाढ १ हजापर्यंत खाली आणली गेली आहे. जूनमध्ये प्रतिदिन ९ हजार नमुना चाचण्या केल्या जात होत्या व करोनाबाधितांचे प्रमाण ३७ टक्के होता. जुलैमध्ये प्रतिदिन सरासरी २५ हजार चाचण्या होऊ लागल्या असून करोनाबाधितांचे प्रमाण ९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. नमुना चाचण्यांचे प्रमाण तीन पटीने वाढवल्यानंतर रुग्णवाढ कमी होऊ लागली आहे, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी सांगितले.

दिल्ली नियंत्रणात कशी?

राजधानीत प्रतिदिन रुग्णसंख्या दोन-तीन हजारांनी वाढू लागल्यानंतर, राज्य व केंद्र सरकारने तज्ज्ञांचा गट तयार केला. त्यात नीती आयोगाचे सदस्य, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, एनसीडीसीचे संचालक सुजीतकुमार सिंह, आयसीएमआरचे सदस्य यांचा समावेश होता. या गटाच्या सल्ल्यानुसार, जलद प्रतिद्रव नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवले गेले. ११ जिल्ह्य़ांमधील नियंत्रित विभागांवर लक्ष्य केंद्रीत करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले गेले. रुग्णांना तातडीने संस्थात्मक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल केले गेले. लक्षणविरहित संशयितांची आरटी-पीसीआर चाचणी केली गेली. त्यातूनही करोनाबाधित आढळले त्यांच्यावर उपचार केले गेले, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली.